Genesis 44

1मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. 2सर्वांत धाकट्याच्या पोत्यात धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.

3दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसह त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. 4ते नगराबाहेर दूर गेले नाहीत, तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला? 5हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’”

6तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे तो त्यांच्याशी बोलला. 7परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, “माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही.

8पाहा, मागे आमच्या पोत्यात मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार? 9या उपर आम्हांपैकी कोणाच्या पोत्यात तुम्हांला जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल. तुम्ही त्याला मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ.” 10कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो माणूस माझ्या धन्याचा गुलाम होईल. इतरजण जाण्यास मोकळे राहतील.”

11नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली. 12कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्याला बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. 13तेव्हा त्या भावांना भयंकर दुःख झाले अतिदुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.

14यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. 15योसफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हांला माहीत नाही का?”

16यहूदा म्हणाला, “माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे? किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे. म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत.” 17परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही. फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”

18मग यहूदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, “माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजासमान आहात. 19माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे का?’

20आणि आम्ही आपल्या धन्याला म्हणालो, होय, आमचा बाप आहे, तो म्हातारा आहे तसेच बापाच्या म्हातारपणी झालेला लहान भाऊ आहे. आणि त्याचा भाऊ मरण पावला आहे. त्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे. आणि त्याचा बाप त्याच्यावर प्रीती करतो. 21आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, ‘मग त्याला माझ्याकडे घेऊन या. मला त्याला पाहावयाचे आहे.’ 22आणि आम्ही आपणांस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल.

23परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’ 24मग असे झाले की, आम्ही तुमचा सेवक आमचा बाप याच्याकडे परत गेलो व आमचा धनी जे बोलला ते त्याला सांगितले. 25आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा. 26आणि आम्ही म्हणालो, आम्ही आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही, कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्याखेरीज तुम्हांला माझे तोंड पुन्हा पाहता येणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे.

27मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हांला माहीत आहे की, माझ्या बायकोच्या पोटी मला दोन मुलगे झाले. 28आणि त्यातला एक माझ्यापासून दूर निघून गेला आहे आणि मी म्हणालो, खरोखर त्याला वन्य पशूने फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून मी त्याला पाहिले नाही. 29आणि आता माझ्या ह्या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्याला जर काही अपाय झाला तर तुम्ही माझे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला कारण व्हाल.

30म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे, 31असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील. 32ह्या मुलाबद्दल मी माझ्या बापास हमी दिली आहे. मी म्हटले, ‘जर मी त्याला तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’

33म्हणून आता, मी तुम्हांला विनंती करतो, मला, तुमच्या ह्या सेवकाला या मुलाच्याऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या. माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.”

34

Copyright information for MarULB